पुसेगाव – मुंबईतील विक्रोळी येथून शनिवारी (दि. 6) विसापूर, ता. खटाव येथे आलेल्या दाम्पत्याच्या करोना चाचणीचा अहवाल अवघ्या 30 तासांनी काल (दि. 7) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खटाव तालुक्याच्या ग्रामीण भागात घबराट पसरली आहे. संपूर्ण विसापूर गाव सील करून कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. फलटण-औध रस्त्यावर पुसेगावपासून चार किमी अंतरावर असलेल्या विसापूरची लोकसंख्या चार हजार सातशे आहे. या गावात सात ते आठ वाड्या-वस्त्या आहेत. विक्रोळी (मुंबई) येथून स्वतःच्या कारने पती (वय 72), पत्नी (वय 67) व भाचा (वय 20) हे विसापूरला येत असताना प्रवासात ताप आल्याने त्या दाम्पत्याच्या घशातील स्रावाचे नमुने शिरवळ येथेच घेण्यात आले होते. ते कुटुंब विसापूर येथे शनिवारी आल्यावर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचा अहवाल काल (दि. 7) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आदित्य गुजर, तलाठी गणेश बोबडे, आरोग्य सहाय्यक व आरोग्यसेवकांनी तातडीने विसापूर येथे भेट देऊन ग्रामस्थांना सूचना दिल्या. करोनाबाधित दाम्पत्याला मायणी येथील कोव्हिड हेल्थ सेटरमध्ये तर त्यांचा भाचा व मुलाला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. त्यांच्या संपर्कातील तीन कुटुंबांमधील व्यक्ती व आशा स्वयंसेविकेला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी रमेश काळे, नायब तहसीलदार सीताकांत शिर्के, पुसेगावचे सपोनि विश्वजित घोडके, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, मंडलाधिकारी व्ही. आर. तोरडमल,तलाठी बोबडे, ग्रामसेवक एस. एस. पवार, सरपंच रामभाऊ सावंत, पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी सोमवारी सकाळी पाहणी करून गाव सील केले. संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन तर तीन किमीचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. गावातील किराणा दुकाने, दूध डेअरी बंद ठेवण्यात आली आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी सर्वेक्षण केले.