श्रीरामपूर/ कोल्हार खुर्द – श्रीरामपूर तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाच, कुरणपूर येथे 10 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दर्शन चद्रकांत देठे या दुर्दैवी मृत मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री 8.45 घडली. या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा तसेच वनअधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ सहा गावातील संतप्त ग्रामस्थांनी कुरणपूर-फत्याबादमध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
कुरणपूर जवळच वस्तीवर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे तेथे दर्शन देठे आरतीसाठी गेलेला होता. आरती झाल्यानंतर रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास चुलती व वस्तीवरील काही मुला व महिलांसह तो घरी परतत होता.
त्याचवेळी रस्त्याच्या कडेला नामदेव नामदेव थोरात या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला. कुणाला काही कळण्याचा आत त्याने दर्शनवर हल्ला केला व त्याला शेतामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे फूट ओढत नेले. यावेळी अश्विनी देठे हिने आरडाओरड केली. आरतीसाठी जमलेल्या रामेश्वर देठे, राधाकृष्ण देठे, संजय देठे, जयवंत देठे, अनिल देठे, सुनील देठे, मच्छिंद्र देठे, दत्तात्रय देठे, मनोज देठे, बाबासाहेब देठे, मयूर देठे, आदिनाथ देठे, विठ्ठल देठे, प्रकाश पारखे, नामदेव थोरात, भाऊसाहेब थोरात, सीताराम देठे आदींसह तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.
उसामध्ये मुलाचा शोध घेऊन त्वरित प्रवरा रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथील डॉक्टरांनी दर्शनचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती कळताच कुरणपूर -फत्याबाद मधून अनेक ग्रामस्थांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. फत्याबाद, कुरणपुर, मांडवे, कडित आदी परिसरात बिबट्यांनी अनेक शेळ्या, बोकड, कुत्रे फस्त केलेले ओहत. अनेकदा ग्रामस्थांनी पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी करूनही वनविभागाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे या मुलाचा बळी गेला. वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा निषेधार्थ बेलापूर- कोल्हापूर रस्त्यावर कुरणपूर, फत्याबाद येथे रस्ता रोको आंदोलन येणार आहे.