माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम : शाळा स्वच्छतेसाठी दिले व्हॅक्युम क्लीनर
न्हावरे -शाळेच्या व आपल्याला शिकवलेल्या शिक्षकांच्या कायमच ऋणात राहून ज्या शाळेतील शिक्षकांनी आपल्याला घडवले. त्या शाळेसाठी शिक्षकदिनी काहीतरी देण्याची भावना म्हणजे शाळेविषयी असलेली आपुलकी, प्रेम याचेच उदाहरण आहे.
अशाच प्रकारे शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सन 1997-98 च्या दहावीच्या बॅचने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुमारे 50 हजार रुपये किंमतीचे दोन व्हॅक्युम क्लीनर (सफाई यंत्र) आज (दि. 5) शाळेला भेट दिले. पंधरा दिवसांपूर्वी माजी विद्यार्थ्यांचा येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात मेळावा झाला होता. विद्यालयाची प्रशस्त इमारत असून, विद्यालयात इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग आहेत. याठिकाणी येथील व परिसरातील गावांतील सुमारे दोन हजार विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत; मात्र मदतनीस सेवकांची संख्या कमी असल्यामुळे अस्वच्छतेचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे विद्यालयाची स्वच्छतेची गरज व मागणी लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी आपण शाळेचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून एकत्र येत मुख्याध्यापक किसन गलांडे, पर्यवेक्षक लक्ष्मण मुरादे यांच्याकडे दोन्ही यंत्रे सुपूर्द केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके हे होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी प्रतिनिधी जनार्दन लोणकर, गणेश गायकवाड, राजेंद्र गोसावी, भानुदास सरके, उपशिक्षक संतोष शेळके, शिवाजी वीर, बकुळा भोईटे, संगीता पल्हारे, ग्रंथपाल प्रताप भोईटे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक क्रीडाशिक्षक कैलास खंडागळे, सूत्रसंचालन विष्णु संकपाळ यांनी, प्रवीण मुळीक यांनी आभार मानले.