मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला पहिला विजय मिळाला असून कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.
भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २० हजारपेक्षा जास्त मते पडली. तर शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ ९ हजार ५०० मते पडली आहेत. दरम्यान, हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मनाला जात आहे.
या विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षात मी जे काम केलं. त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे.
तब्बल ३३ संघटनाचा आम्हाला पाठिंबा होता. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आज सार्थकी लागला आहे, असे ते म्हणाले.