अन्…पुण्यातल्या नेत्यांनी जागवल्या गणेशोत्सवाच्या आठवणी …

पुणे – पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे देश-परदेशांत अतिशय कुतुहलाचा विषय असतो. त्यातून लक्ष्मी रस्त्यावरील जंगी मिरवणूक आणि तिचे वैभव पाहण्यासाठी लाखो भाविकांची दरवर्षी गर्दी होत असते. बेलबाग चौकापासून ते टिळक चौकापर्यंत (अलका टॉकिज) अक्षरश: “फीलगुड’ माहौल असतो. परंतु यंदा या गोष्टी अनुभवायलाच मिळाल्या नाहीत. या आठवणी यंदा काहींनी घरी बसूनच जागवल्या, तर नेते मंडळींनी लक्ष्मी रस्त्यावर येऊनच दरवर्षीच्या आठवणींना उजाळा दिला. मिरवणूक नव्हती, परंतु लक्ष्मी रस्त्यावरील “आझाद क्लॉथ सेंटर’ मध्ये सगळ्या नेत्यांनी उत्सवाच्या आठवणी सांगितल्या.

करोनामुळे यंदाचा संपूर्ण गणेशोत्सवच जणु स्थगित झाला. त्यामुळे दरवर्षी रांगोळ्यांच्या पायघड्या, सनई-चौघडा, ढोलताशा, लेझीम, विविध पथके, बॅंड, श्रीगणेशाचा जयघोष, विविध उपक्रमांचे रथ या सगळ्यांनी फुलून गेलेला लक्ष्मी रस्ता, त्यावरून जाणारी मानाच्या गणपतींची आणि अन्य पुण्यातील प्रसिद्ध गणेशांची मिरवणूक, अन्य रस्त्यांवरूनही येणाऱ्या मंडळांचा उत्साहाचा पूर यंदा आलाच नाही.

विसर्जन मिरवणूक नसली, तरी गप्पांचा फड बंद नको या हेतूने विविध पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी यंदा गप्पांच्या फडात सहभागी झाले. लक्ष्मी रस्त्यावरील मानाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे प्रस्थान पालकमंत्री, महापौर यांच्या उपस्थितीत पार पडले, की सारे नेतेमंडळी ही गप्पांसाठी एकत्र येतात. लक्ष्मी रस्त्यावरील आझाद क्लॉथ स्टोअर्समध्ये दरवर्षीप्रमाणे सगळे जमून गणेशोत्सवाच्या आठवणी, नवीन घडामोडींवर गप्पा मारतात. ही प्रथा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अंकुश काकडे यांनी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण दिले.

महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, डॉ. सतीश देसाई, संदीप खर्डेकर, रवींद्र माळवदकर, दगडूशेठ गणपती मंडळाचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांच्यासह पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे आदी या वेळी उपस्थित होते.

विसर्जनाच्या निमित्ताने वेगवेगळे गट एकत्र येत आणि मिसळ खाण्याचा कार्यक्रम त्यानंतर होत असे आणि त्यानंतर त्यावेळी प्रत्येक जण आपापल्या नेत्याच्या बरोबर मिसळ खायला जाई, अशी आठवण डॉ. देसाई यांनी सांगितली. तर कॉंग्रेस नेते शिवरकर यांनी बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्याबरोबरचा विसर्जन मिरवणुकीनंतरचा किस्सा “शेअर’ केला. मंडळांबरोबर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणे, ढोलवादन आणि अन्य विषयांवरही याठिकाणी चर्चा झाली.

 

नेत्यांनी ‘फेमस’ केली फुगडी

कोणालाही राग न हेता केवळ एकमेकांची टोपी उडवणेच नव्हे, तर फुगडीही या नेत्यांनी “फेमस’ केली. अगदी पालकमंत्री अजित पवार यांच्यासह सगळ्यांनी रस्त्यावर मिरवणुकीच्या आधी फुगडीचे फेर धरले आहेत. त्याविषयीचा किस्सा मोहन जोशी यांनी सांगितला. तर सुरेश कलमाडी आणि गिरीश बापट किंवा विठ्ठल तुपे अशी फुगडीची जोडी असे, असे जोशी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.