पुणे- संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या करोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला पुण्यात सुरवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांनी तयार केलेली लस ससून रुग्णालयातील पाच जणांना टोचण्यात आली आहे. तर पुढील काही दिवसांत रुग्णालयात दीडशे स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात येणार आहे.
मागील आठवड्यात पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या “कोव्हीशिल्ड’ या लसीच्या चाचणीला सुरवात झाली. आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयाच्या वढू केंद्रातील दोन स्वयंसेवकांना लस टोचल्यानंतर आता ससून रुग्णालयातही मंगळवारी (दि. 1) प्रारंभ झाला आहे. हे संशोधन पुढे सुरू राहणार असल्याने त्यातील माहिती जाहीर आताच करता येणार नाही. परंतु, दीडशे जणांना ससून रुग्णालयात लस दिली जाईल. त्याचे निष्कर्ष हे संबंधित कंपनीलाच सांगता येतील. या दुसऱ्या टप्प्यात लसीची सुरक्षितता तपासली जाणार आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
देशातील काही केंद्रावर सीरम इन्सिटयूटची “कोव्हीशिल्ड’ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने करार केलेल्या “अस्ट्राझेनका’ कंपनीच्या “अँस्ट्राझेन’ या लसींचा एकमेकांशी तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे. एका लसीचे उत्पादन पुण्यात तर दुसऱ्याचे इंग्लंड अशा दोन ठिकाणी उत्पादित होणाऱ्या एकाच लशीमध्ये किती टक्के अँटिबॉडीज तयार होतात हे तपासण्याच्या पद्धतीला वैद्यकीय भाषेत “ब्रिचिंग स्टडी’ असे म्हटले जाते.
या अभ्यासांतर्गत दोन्ही लसींमध्ये साधर्म्य आहे का, हे पाहिले जाणार आहे. हा अभ्यास केईएमसह देशात चार केंद्रात होणार आहे. त्यात चेन्नई, चंडिगड, म्हैसूर तसेच वर्धा या केंद्राचा समावेश आहे. या दोन्ही लसींच्या तुलनात्मक अभ्यासाद्वारे उत्पादनानंतर लसीची उपयुक्तता कशी राहू शकते, किती प्रमाणात अँटिबॉडीज तयार होतात हे तपासण्यात येणार आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. आशीष बावडेकर यांनी दिली.