मुंबई – निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल अमित शहांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी राऊत यांनी शहांवर कडाऊन टीका केली. यावेळी बोलताना राऊत यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांवरून भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी आता संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.
सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशी टीका अमित शाह यांनी यावेळी केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता शिंदे गटातील नेते संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका असून, संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांना वेड्यात काढले आहे.
संजय शिरसाठ म्हणाले, “सध्या संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज असून, राऊत यांना शॉक देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही जेव्हा टीका करतो तेव्हा आमची जीभ घसरते असं म्हणू नका, नारायण राणे यांना जेलमध्ये टाकलं होते,
त्यामुळे आता याबाबत मुख्यमंत्री निश्चित विचार करतील, याच्या थोबाडावर अंकुश लावावा’ अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. संजय राऊत यांनी जी भाषा वापरली ती चुकीची असून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करणार असल्याचेही संजय शिरसाठ यांनी यावेळी सांगितले.