पेशावर – पाकिस्तानातील वरिष्ठ वकिलाची उच्च न्यायालयातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अब्दुल लतिफ आफ्रिदी असे या वरिष्ठ वकिलाचे नाव आहे. त्यांच्याच सहकाऱ्याने त्यांची हत्या केली आहे. वकिलांच्या अधिकृत वेशभुषेत असतानाच त्यांच्यावर 6 गोळ्या झाडण्यात आल्या.
आफ्रिदी हे 1990 मध्ये संसदेचेही सदस्य राहिले होते. आफ्रिदी हे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. पेशावर उच्च न्यायालयाच्या आवारात आपल्या सहकाऱ्यांबरोबर हास्यविनोद करत असताना आदनान खान आफ्रिदी या एका कनिष्ठ वकिलाने त्यांच्यावर अगदी जवळून 6 गोळ्या झाडल्या. त्यानंतर या कनिष्ठ वकिलाने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले, असे पेशावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
आपले आणि आफ्रिदी यांचे भांडण झाले होते. मी केवळ सूड उगवला असे या वकिलाने नंतर सांगितले. आफ्रिदी यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
आफ्रिदी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या आदनान खान आफ्रिदीच्या वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात आफ्रिदी यांचा हात असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. आदनान खान आफ्रिदी हा अब्दुल लतिफ आफ्रिदी यांचा दूरचा नातेवाईक आहे.