मुंबई – यंदाच्या “लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांची घोषणा गायिका उषा मंगेशकर यांनी केली. याशिवाय विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 81व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. या प्रसिद्धीपत्रकानुसार यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे. तर चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता प्रसाद ओकला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालन विशेष पुरस्कार दिला जाणार आहे.
मंगेशकर कुटुंब गेल्या 33 वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो.
येत्या 24 एप्रिल 2023 रोजी यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडणार आहे.
मुंबईतील सायन येथील श्री षण्मुखानंद हॉल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. गतवर्षीपासून मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच व्यक्तीला दिला जातो. दरम्यान, गेल्यावर्षी या पुरस्काराचे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत),
सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे नियम व अटी लागू’
श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन – (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार – श्री.प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)