नवी दिल्ली -माफिया-राजकारणी अतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तरप्रदेश पोलिसांना नोटीस बजावली आहे. आयोगाने उत्तरप्रदेशचे पोलीस प्रमुख आणि प्रयागराजच्या पोलीस आयुक्तांकडून चार आठवड्यांत अहवाल मागवले आहेत.
हत्येशी संबंधित घडामोडी, अतिक-अश्रफच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या प्रती, शवविच्छेदन अहवाल आदींची माहिती आयोगाने मागवली आहे. अतिक आणि अश्रफची शनिवारी रात्री जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात प्रयागराजमधील वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी नेले जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
त्याप्रकरणी तिघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली. हल्ल्यावेळी अतिक आणि अश्रफच्या हातात बेड्या होत्या. त्यांच्या हत्येवेळी घटनास्थळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही कॅमेऱ्यांसह उपस्थित होते.