नांदेड – माझ्या अयशस्वी आयुष्याला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याची चिठ्ठी लिहून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. लोहा शहरात सोमवारी ही घटना उघडकीस आली असून प्रशांत पंढरी ढवळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. “आई आणि अण्णा मला माफ करा..मी माझ्या अनसक्सेस आयुष्याला कंटाळलो आहे..माझ्या समोर जगण्याचे कोणतेच ध्येय राहील नाहीये..मी कोणत्या मुलीसाठी नाही तर माझ्या अनसक्सेस लाईफला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आहे असे तरुणाने चिठ्ठीत म्हटले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 23 वर्षीय प्रशांत ढवळे हा आपल्या कुटुंबियांना सोबत लोहा शहरातील इंदिरा नगर मध्ये राहत होता. एका खाजगी रुग्णालयात तो काम करायचा. बीएससी नंतर तो “डीएमएलटी’ चे शिक्षण देखील घेत होता. काही तरी करून दाखवायचे त्याच स्वप्न होते. त्यामुळे त्याने सातत्याने स्पर्धा परीक्षा दिली. पोलीस भरतीत ही तो उतरला. मात्र यात अपयश मिळत असल्याने हतबल झाला होता.
रविवारी मध्यरात्री तो आपल्या रूम मध्ये गेला. आतून त्याने कडी लावली त्यानंतर लोखंडी रॉडला दोरी बांधून त्याने गळफास घेतला. सकाळी उशीरा पर्यंत दरवाजा बंद असल्याने कुटुंबियांने दरवाजा ठोठावला. मात्र काही प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्या नंतर प्रशांतचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्येपूर्वी प्रशांतने चिठ्ठी देखील लिहिली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.