न्हावरे (प्रतिनिधी) :- न्हावरे (ता.शिरुर ) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१९ – २० मधील एफआरपीची उर्वरित रक्कम ४ कोटी ३४ लाख ९३ हजार रुपये नुकतीच उसउत्पादक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून गतवर्षीच्या गळीत हंगामासाठी केंद्रशासनाने घोडगंगा कारखान्यासाठी जाहीर केलेली एफआरपीची देय रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांना अदा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी दिली.
गतवर्षीच्या गळीत हंगामासाठी रावसाहेबदादा पवार घोडगंगा कारखान्याची केंद्रशासनाने जाहीर केलेली निव्वळ एफआरपी प्रति मे. टन २४८०.३५ रुपये इतकी होती. एफआरपी प्रमाणे कारखान्याने आतापर्यंत ६५ कोटी ९० लाख ४ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. त्यामुळे कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामासाठीची एफआरपीची पूर्ण देय रक्कम शेतकऱ्यांना अदा केली असल्याचे आमदार अशोक पवार यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामासाठी घोडगंगाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उस उपलब्ध असून,कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी साडेसात लाख मे.टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास कारखान्याला आर्थिक अडचण भासणार नाही. तसेच करखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले व आपल्या संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून आपला उस घोडगंगा साखर कारखान्यास गाळपासाठी घालून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी बोलताना आमदार अशोक पवार यांनी केले.
संपूर्ण देशातील साखर उद्योग अडचणीत असताना त्यातून मार्ग काढीत रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामाची एफआरपी पूर्ण केल्याने सभासद व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे.