केरळ – केरळमध्ये आज सकाळी प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन टास्क फोर्सने जिलेटनच्या 100 पेक्षा जास्त कांड्या जप्त केल्या आहे. ही स्फोटके केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. रेल्वेच्या ज्या सीटखाली ही स्फोटके मिळाली, तिथे एक महिला बसली होती. ही महिला चेन्नई ते थालास्सेरी असा प्रवास करत होती. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या महिलेने स्फोटके आणली का? याचा तपास पोलीस करत आहे.
जिलेटिन हे विस्फोटक असून ते लिक्विड फॉर्ममध्ये असते. भारतात हे विस्फोटक डोंगर फोडण्यासाठी किंवा खाणकामामध्ये वापरण्यात येते. भारतात याच्या वापरासाठी परवान्याची गरज आहे. परंतु याच्या वापरासाठी सरकारने नियमावली केली आहे. जिलेटिनचा वापर नक्षली संघटनेबरोबरच आतंकवादी संघटना देखील करतात.
दरम्यान, भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ गुरुवारी जिलेटिनचा साठा आढळून आला होता. यावेळी जिलेटिनच्या 25 कांड्या सापडल्या असून याप्रकरणी नागपूर कनेक्शन समोर आले आहे. स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव आहे.