कराची – पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच अनेक दहशतवादी केले जात आहे. यातच आता कराचीमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर आज आयइडीचा एक मध्यम तीव्रतेचा स्फोट झाला. कार्यालयाबाहेरील पार्किंगमधील आयइडी असलेली पिशवी ठेवण्यात आली होती. ही प्लॅस्टिकची पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकण्यात आली असता त्याचा स्फोट झाल्याचे पोलीस महानिरीक्षक सईद असाद राजा यांनी सांगितले.
कार्यालयाच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेल्या पिशवीतील बॉम्बला रात्री ९ ते १० वाजण्यादरम्यानचा टायमर सेट करण्यात आला होता. मात्र स्वच्छता कर्मऱ्याने त्यापूर्वीच ही पिशवी बघितली आणि कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकून दिली. त्यानंतर मध्यम तीव्रतेचा स्फोट झाला. मात्र टायमर सेट केलेल्या ४०० ग्रॅम वजनाच्या बॉम्बचा स्फोट झाला नाही. या स्फोटामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणीही जखमी देखील झाले नाही.
निवडणूक आयोगाच्या इमारतीला लक्ष्य करण्यासाठी हा बॉम्ब तेथे ठेवला गेला होता. जर पार्किंगच्या आत स्फोट झाला असता तर जीवितहानी झाली असती आणि इमारतीचे देखील नुकसान झाले असते. निवडणुका तोंडावर असताना पाकिस्तानमध्ये हिंसाचाराला प्रारंभ झाला आहे. कालच निवडणूक प्रचारादरम्यान दोन गटांमध्ये हिंसाचार भडकला. त्यामध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
राजकीय हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काल एक आपत्कालिन बैठक बोलावली आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आदेशही दिले आहेत. कराची, क्वेट्टासह सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या अन्य शहरांमध्ये हिंसक घटना घडत आहेत.