आकडा “तेराशे’च्या पार : एकाच दिवसात 92 रुग्णांना लागण, दोघांचा मृत्यू
पिंपरी – जून महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु झालेला “करोना’चा उद्रेक दिवसें-दिवस उग्र रुप धारण करत आहे. मंगळवारी आतापर्यंतची सर्वांत मोठी रुग्णवाढ पहायला मिळाली. मंगळवारी शहरातील 84 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 8 अशा एकूण 92 रुग्णांना “करोना’ची लागण झाली. तर “करोना’मुळे दोन रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे.
शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची 1330 इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 48 पुरुष व 36 महिलांचा समावेश आहे. तसेच ज्या भागामध्ये करोनाचे संपूर्ण रुग्ण बरे झाले होते, त्या भागात करोनाची पुन्हा एन्ट्री झाल्याने चिंता वाढली आहे. आज पुन्हा खराळवाडी व नेहरुनगर येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज रमाबाईनगर पिंपरी, ताम्हाणेवस्ती निगडी, तापकिरनगर मोशी, प्रियदर्शनीनगर सांगवी, निगडी, खऱाळवाडी, बौद्धनगर, काळेवाडी, दापोडी, चिंचवड, नेहरुनगर, मोरेवस्ती, डी वाय पाटील हॉस्टेल या भागातील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दिवसभरात दोन जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दापोडीतील सिद्धार्थनगर येथील 70 वर्षीय व लोणावळा येथील 57 वर्षीय अशा दोन महिलांचा करोनामुळे रुग्णालयात मृत्यू झाला. शहरातील मृतांची संख्या 23 झाली आहे. दिवसभरात 57 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त रुग्णांची संख्या 791 झाली आहे.
रुग्णवाहिका चालकालाही करोनाची लागण
आतापर्यंत शहरातील पोलिस, डॉक्टर, नर्स यांना करोनाची लागण झाली. वायसीएम रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर चालक असलेल्या एका व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा रुग्णालयात एकाचा मृत्यू
सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात करोनाने मंगळवारी (दि. 16) बोपोडी येथील 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आज सहा जण करोनाबाधित झाले आहेत. सांगवी, दापोडी आणि औंध येथील हे रुग्ण आहेत. करोनाबाधितांमध्ये 2 पुरुष, 2 महिला, 17 वर्षीय मुलासह 8 वर्षीय मुलीचा समावेश आहे. सांगवी येथील एकाच कुटुंबातील तिघांना आणि औंध येथील एकाच कुटुंबातील दोघांना करोनाची लागण झाली आहे. दापोडीतील 17 वर्षाच्या मुलाला लागण झाली आहे.