लारा आणि सारवान करणार विंडीजच्या संघाला मार्गदर्शन

जमैका – एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत भारतीय संघाकडून एकतर्फी पराभूत झालेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला कसोटी मधील आपले आव्हान कायम राखायचे आहे. त्यासाठी त्यांच्या संघ व्यवस्थापनाने ब्रायन लारा आणि रामनरेश सारवान या दोन दिग्गज खेळाडूंना संघातील फलंदाजांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेला सुरुवात झाल्यामुळे या कसोटी मालिकेला एक वेगळीच उंची मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही संघ कोणतीच कसर बाकी ठेवणार नाही. पण, संघातील प्रमुख फलंदाजांना सातत्याने येणारे अपयश पाहता त्यांना कसोटी मालिकेतही डोळ्यासमोर पराभव दिसत असावा, म्हणूनच त्यांच्या मदतीला हे दोन दिग्गज फलंदाज धावले आहेत.

ब्रायन लारा आणि रामनरेश सारवान कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची तयारी करून घेणार आहेत. घरच्या मैदानावर झालेल्या मागील कसोटी मालिकेत विंडीजनं इंग्लंडवर 2-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारताविरुद्धही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. जॉन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, शिमरोन हेटमायर आणि शाय होप या फलंदाजांना पुन्हा फॉर्मात आणण्यासाठी विंडीज क्रिकेट बोर्डानं लारा आणि सारवान यांच्याकडून मदत मागितली आहे. या दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 17795 धावा केल्या आहेत. हे दोघेही वेस्ट इंडिजच्या सराव सत्रात सहभागी होणार आहेत.

या विषयी बोलताना वेस्ट इंडिज क्रिकेटचे संचालक जिमी ऍडम म्हणाले की, आमच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यांच्याकडे भविष्याचे स्टार म्हणून पाहिले जात आहे, कसोटी क्रिकेटमध्ये संघात सकारात्मक बदल पाहायला मिळाले आहेत. आम्ही इंग्लंडला पराभूत करण्याचा पराक्रम केला आणि त्यामुळे खेळाडूंचाही आत्मविश्‍वास चांगलाच वाढला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.