विज्ञानविश्‍व : फेशिअल रेकग्निशनवर बंदी?

-डॉ. मेघश्री दळवी

एखाद्या फोटोवरून किंवा व्हिडिओवरून त्यातल्या व्यक्‍तीची ओळख निश्‍चित करणे म्हणजे फेशिअल रेकग्निशन. या तंत्रज्ञानाचा उगम गेल्या शतकातला. सुरुवात होती ती साधीच. फोटोतल्या चेहऱ्याची ठेवण पाहायची, त्याच्या वेगवेगळ्या भागाची वैशिष्ट्ये वेगळी करायची, ती उपलब्ध फोटोंच्या डेटाबेसशी ताडून पाहायची आणि कोणत्या फोटोशी जुळते ते पाहायचं, एवढीच.

फोटोतला प्रकाश, चेहरा किती स्पष्ट आला आहे, त्यावरचा छायाप्रकाशाचा खेळ, चेहरा थेट कॅमेऱ्यासमोर आहे की वळलेला आहे, अशा अनेक गोष्टींवर फेशिअल रेकग्निशनचा अचूकपणा अवलंबून होता. या तंत्रज्ञानाचा वापरदेखील मर्यादित होता. पोलिसांसाठी किंवा हजेरी नोंदण्यासाठी असा. त्याची अचूकता वाढवण्यासाठी काही प्रयत्न होत होते. पण ते केवळ जिज्ञासा म्हणून, संशोधनात्मक प्रयोग म्हणून. मागचं शतक संपता संपता संगणकांचं एकूण सामर्थ्य वाढत गेलं.

गणनाचा वेग, विश्‍लेषणाची व्याप्ती आणि स्मृतीची क्षमता वाढत यात झपाट्याने प्रगती होत गेली. त्या सुमारास फेशिअल रेकग्निशनची प्रगत यंत्रणा हळूहळू इतर कामांसाठी वापरली जाऊ लागली. त्यात एअरपोर्ट, मोठी ट्रेन स्टेशन्स, मॉल्स, काही संवेदनशील क्षेत्रं अशा ठिकाणी जमणाऱ्या समूहातल्या व्यक्‍तींना स्पॉट करण्यासाठी सीसीटीव्ही आणि सोबत फेशिअल रेकग्निशन हे उपयोगी पडायला लागलं. विशेषत: न्यूयॉर्कमधील दहशतवादी हल्ल्यानंतर सार्वजनिक सुरक्षेसाठी त्याचा वापर वाढला.

बघता बघता हे तंत्रज्ञान वेगाने पसरायला लागलं. सोशल मीडिया आल्यावर जशी फोटो डकवायची क्रेझ वाढली, तशी फेसबुकसारख्या ऍपनी फेशिअल रेकग्निशन वापरायला सुरुवात केली. हा फोटो तुमचा आहे का? अशी विचारणा करत त्यांनी जागोजागी विखुरलेल्या आपल्या फोटोंचा वापर करायला सुरुवात केली. आपण किंवा आपल्या मित्रमंडळींनी फोटोत आपल्याला टॅग केलं की आपोआप फोटोंचा प्रचंड डेटाबेस तयार होतो. या डेटाबेसचा गैरवापर होऊ शकतो, होताना आपण पाहिलं आहे.

आज कार्यालयं, राहत्या इमारती, सार्वजनिक जागा, जागोजागी सीसीटीव्ही असतात आणि सतत फूटेज गोळा होत असतं. अनेक ऍप्सना आपण आपल्या मोबाइलमधले फोटो वापरण्याची परवानगी देतो. आपणहून कित्येक ठिकाणी फोटो अपलोड करतो. त्याचवेळी फेशिअल रेकग्निशन हे तंत्रज्ञान अतिशय प्रगत झालं आहे आणि सहज उपलब्ध आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान वादग्रस्त होत आहे. अलिकडे मे महिन्यात सानफ्रान्सिस्को शहराने त्यावर बंदी आणून एक नवा पायंडा पाडून दिला आहे. मागोमाग सॉमरव्हिल आणि ओकलॅंड शहरांनीही अशी बंदी आणली आहे. मायक्रोसॉफ्टने आपला फोटोंचा डेटाबेस इंटरनेटवरून काढून घेतला आहे.

गेल्या काही दिवसांत फेसबुकच्या फेशिअल रेकग्निशन वापराबाबत काही वापरकर्त्यांनी दावा ठोकला आहे.  त्यामुळे हे तंत्रज्ञान सर्वांच्या भल्यासाठी वापरावं, की खासगीपणा जपण्यासाठी त्यावर बंदी घालावी ही दुविधा आता कायदेतज्ज्ञांसमोर आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत असे अनेक नैतिक आणि कायदेशीर पेच उभे राहतात आणि त्यातून आपल्याला नेहमीच योग्य मार्ग काढावा लागतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×