नवी दिल्ली : आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज संध्याकाळी लालू प्रसाद यादव यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आज दिल्लीत जाऊन संपूर्ण व्यवस्था पाहणार आहे. लालू यादव सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.
पाटण्यातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यादव यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला आणले जाणार आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान मोदी, गांधी परिवार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडे विचारपूस केली.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्या प्रकृती स्वास्थासाठी जनतेकडून प्रार्थना केली जात आहे. त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्ते पारस रुग्णालयात पोहोचले आहेत. याबाबत तेजस्वी यादव यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमधून तेजस्वी यादव यांनी लोकांना आवाहन केलं आहे.
ते म्हणाले आहेत की, “लालू प्रसाद यादव यांच्यावर पाटणा येथील पारस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कृपया त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी करु नका. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना खूप त्रास होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो.”