पुणे – ललित पाटीलच्या वकील मैत्रिणीचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे. तिला या प्रकरणात अटक अटळ आहे. ललितच्या पलायन प्रकरणात सहभागी असलेली ही महिला आणि दुसऱ्या मैत्रिणीची न्यायालयाने पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून येरवडा कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी या महिलेचा ताबा मागितल्यानंतर न्यायालयाने तिच्या प्रॉडक्शन वॉरंटला परवानगी दिली आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात या महिलेला सहआरोपी करण्यात आले. अमली पदार्थ विक्रीच्या पैशांतून खरेदी केलेल्या महागड्या कारचे हप्ते भूषण पाटीलच्या बॅंक खात्यातून जात होते. तसेच नाशकातील ड्रग्ज कारखान्याबाबत या वकील महिलेस माहिती होती. आरोपी जिशान शेख हा कारखान्यातील उत्पादनाची जबाबदारी सांभाळत होता. तो या महिलेच्या संपर्कात होता.
दरम्यान, गुन्ह्यातील सहभाग महत्त्वाचा असल्याने तिच्या अटकेसाठी प्रॉडक्शन वॉरंट गुन्हे शाखेच्या वतीने सादर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. बिराजदार यांनी तिला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यास परवानगी दिली.
भूषण, अभिषेकला कोठडी
दरम्यान, ललितचा भाऊ भूषण पाटील व ड्रग्ज तस्करीमधील आरोपी अभिषेक बलकवडे या दोघांना ड्रग्जप्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या दोघांचा ललित पाटील पलायन प्रकरणात सहभाग असल्याने त्यांचेही प्रॉडक्शन वॉरंट न्यायालयात सादर करण्यात आले. ललित पळून जाण्यात त्यांचाही सहभाग व आर्थिक रसद पुरविल्याचेही निष्पन्न झाले असून त्या अनुषंगाने पोलिसांनी दोघांचा ताबा मागितला.