पुसेगाव – खातगुण (ता. खटाव) येथे एका मुस्लिम कुटुंबाकडून 56 वर्षापासूनची दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापनेची परंपरा अबाधित ठेवली गेली. क्षुल्लक कारणांवरुन मतभेदाचे वारे जोरदार वाहू लागण्याच्या काळात हिंदू- मुस्लिम ऐक्याची परंपरा तसेच सर्व धर्म समभावाचे दर्शनच यानिमित्ताने सय्यद कुटूंबियांकडून घडवले गेले.
खातगुण येथे 1967 पासून सर्व सामान्य कुटुंबातील पै. अहमद रसूल सय्यद (मामू) यांनी अपंग असूनही दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करत त्या काळात एक आगळीवेगळी प्रथा सुरू केली. अन्य कोणाच्याही मतांचा विचार न करता, जाती-पातीच्या भिंती झुगारून देत त्यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही पुढच्या पिढीकडून जपली गेली आहे. खातगुण हे गाव पीरसाहेब राजेवली बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झाले. या पवित्र भूमीत हिंदू मुस्लिम ऐक्य आधीपासूनच दिसून येते.
याच भूमीत सय्यद कुटुंबाकडूनही दुर्गादेवी प्रतिष्ठापनेची परंपरा अबाधित राखली गेली आहे. पै. अहमद रसूल सय्यद (मामू) यांनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या पश्चात त्यांचे पुतणे शब्बीर बाबालाल सय्यद यांच्यासह त्यांची पत्नी शबाना शब्बीर सय्यद आणि कुटुंबीय भक्तीभावाने जपत आहेत. छोटेसे सायकल दुरुस्तीचे दुकान व छोटी- मोठी मेकॅनिकची कामे करून त्यांनी काकांचा हा धार्मिक वसा व वारसा अत्यंत श्रद्धेने जोपासला आहे. पारंपारिक रितीप्रमाणे पहाटे काकड आरती, सकाळी व सायंकाळी आरती व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी ही उत्सव साजरा केला. नऊ दिवसांच्या उत्सव काळात या मुस्लिम कुटुंबाकडून उपवासही धरले गेले.
========================