पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट प्रकरणातील मुख्य फरार आरोपी संदीप धुनिया स्वत:ची ओळख लपवून रॅकेट्स चालवत असल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडे त्याच्या सहकाऱ्यांसह वेगवेगळ्या नावांचे बनावट पाच आधारकार्ड सापडले आहेत. विशेष म्हणजे, तो इतर व्यक्तींशी व्हर्च्युअल पर्सनल कॉल सिस्टीमव्दारे (व्हीपीएन) बोलत होता. यामुळे तांत्रिक तपासात अडथळे निर्माण झाले आहेत.
कुरकुंभ येथील अर्थ केम लॅबेरोटरीत तयार झालेले मेफेड्रोन हैदर शेखच्या माध्यमातून वितरित होते. तर, ते भीमाजी साबळे यांच्या कंपनीत तयार होत होते. साबळेला ऑर्डर देणे, हैदरला वितरण करण्यास सांगणे, दिल्लीला कुरिअरव्दारे माल मागून घेणे आणि तेथून परदेशात पाठवणे हे सर्व संदीप धुनिया व्हीपीएन कॉलव्दारेच करत होता.
यामुळे त्याचा मोबाइल नंबर साखळीतील इतर कोणाकडेच नाही. तर, तो कंपनीमालक साबळे यालाही प्रत्यक्षात भेटलेला नाही. साबळेच्या तपासात एक व्यक्ती धुनिया म्हणून भेटून गेल्याचे म्हटले आहे. मात्र, तो धुनियाच होता की त्याने दुसऱ्या कोणाला स्वत:चे नाव धारण करुन पाठवले होते याबाबत शंका निर्माण झाली आहे.
दरम्यान, धुनिया हा २०१६ साली एका ड्रग प्रकरणात अटक झाल्यावर जुलै २०२३ रोजी जामिनावर बाहेर आला आहे. त्याने ऑक्टोबरमध्ये साबळेला हस्तकामार्फत मेफेड्रोन निर्माण करण्याची ऑर्डर दिली. त्याला कच्या मालासाठी सात ते आठ लाख रुपयेही बँक खात्यावर पाठवले आहेत. या गुन्ह्यात आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील कंपनीचा मालक भुजबळ हा पीएच.डी. धारक आहे. तसेच तो सधनही आहे. तरीही तो मेफेड्रोनच्या व्यवसायात का शिरला, याचा तपास पोलीस करत आहेत.
परदेशात फरार झाल्याची शक्यता
या तस्करी साखळीतील इतर व्यक्ती व्हॉट्सअॅप कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात होती. तर, धुनिया हा स्वत:ची ओळख लपवून ठेवत वावरत होता. यामुळे तो बनावट ओळखपत्राच्या आधारेच परदेशात फरार झाल्याची शक्यता यंत्रणांनी वर्तवली आहे.
व्हीपीएन कसे कार्य करते?
– डेटा लिक न होता समोरच्या व्यक्तीशी संपर्क केला जातो.
– तुमचा पत्ता आणि तुमची ओळख गोपनीय राहते.
-आयपी अॅड्रेस ट्रॅक करता येत नाही