नगर -गरजेच्या वेळी वंचित घटकाला केलेली मदत लाख मोलाची ठरते. निराधार बालकांसाठी कार्यरत असलेल्या सावली संस्थेतर्फे राबविण्यात आलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
सावली प्रतिष्ठानातर्फे अकोळनेर (ता. नगर) येथील गरजू 55 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सावली सदस्य तथा सिद्धी फोर्जचे संचालक निनाद टिपुगडे, नीतेश बनसोडे, संजय गारुडकर, माजी सभापती नंदा शेंडगे, सरपंच सविता मेहेत्रे, विद्या भोर, चंद्रकांत मेहेत्रे, रभाजी गारुडकर, अजित रोकडे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
करोनाविषाणूमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत नगर शहरासह ग्रामीण भागातील अनेक परिवारांना जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. अशा काळात जनसहभागातून योग्य गरजू 3000 परिवारांना किराणा साहित्य मोफत देण्याचा स्तुत्य उपक्रम सावली प्रकल्पाने राबविला. निराधार बालकांसाठी कार्यरत या संस्थेने आलेल्या अनुभवातून सध्याच्या परिस्थितीत गरजू परिवारांना केलेली मदत लाख मोलाची असल्याचे मत आमदार लंके यांनी व्यक्त केले.
“घासातील घास, सावलीची हाक’ या उपक्रमांतर्गत संकल्प प्रतिष्ठानच्या सावली परिवारातर्फे 55 गरजू परिवारांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. संजय गारूडकर यांनी गावातील निराधार, वृध्द, एकाकी असणाऱ्या कुटुंबाचा शोध घेतला. त्यामुळेच खऱ्या गरजू कुटुंबांना घासातील घास आपण देऊ शकलो, अशी भूमिका नीतेश बनसोडे यांनी मांडली. निनाद टीपुगडे, जितेंद्र अगरवाल यांचे त्यास सहकार्य मिळाले, असे ते म्हणाले.