बीड : शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक माजली. मांगवडगाव येथे मध्यरात्री ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सामूहिक हल्ल्यातून तिघांची हत्या झाली असून अन्य एक जखमी आहे. मृतकांमध्ये बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार या तिघांचा समावेश आहे. तर जखमीचे नाव समजू शकले नाही. यापैकी एक जण अद्याप पोलिसांना आढळून आलेला नाही.
केजच्या युसुफवाड पोलिस स्टेशन अंतर्गत मांगवडगाव येथील शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांसह अन्य एका व्यक्तीवर गावातील काही व्यक्तींनी सामूहिक हल्ला केला. मारहाण झालेल्या दोन कुटुंबात शेतीवरून वाद होते अशी माहिती मिळत आहे. यात तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह रुग्णालयात पाठविले.
रात्री बारा वाजता एका ट्रॅक्टरमध्ये काही लोक या गावाच्या शिवारात पोहोचले होते. ज्यांनी या कुटुंबावर हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी पवार कुटुंबातील लोकं पळून जाऊ नये म्हणून अक्षरशः मोटारसायकल फोडल्या अशी माहिती मिळते आहे. माहितीनुसार, पवार व निंबाळकर कुटुंबाचा गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद आहे. या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या प्रकरणात बारा जणांना ताब्यात घेतले आहे.