अतिरिक्त आयुक्तांचे आदेश; कर्मचाऱ्यांना बाधा होत असल्याने निर्णय
पुणे – क्षेत्रीय कार्यालयांकडे कार्यरत असलेल्या मात्र करोनाची संख्या वाढलेल्या प्रतिबंधित भागात रहायला असलेल्या सफाई कर्मचारी, शिपाई तसेच बिगाऱ्यांना आता शहरात इतरत्र न पाठविता त्यांना राहत असलेल्या भागातील क्षेत्रीय कार्यालयातच काम दिले जाणार आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात रहायला असलेल्या काही कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसेच ते इतर क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत होते. त्यामुळे पालिकेच्या इतर ठिकाणीही हा आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेले सफाई कर्मचारी, बिगारी, शिपाई हे शहराच्या वेगवेगळ्या भागांतून येतात. प्रामुख्याने हे कर्मचारी, भवानीपेठ, येरवडा, ताडीवाला रस्ता या भागांत राहायला आहेत. मात्र, या परिसरात करोनाचा मोठा प्रसार झाला आहे. परिणामी यातील काही कर्मचारीही गेल्या काही दिवसांत बाधित झाले आहेत. त्यात काही सफाई कर्मचारी, आरोग्य विभागाकडील शिपाई, पाणी सोडणारा कर्मचारी, आरोग्य निरीक्षक यांचा समावेश आहे.
मात्र, हे कर्मचारी शहराच्या इतर भागातील क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने आता शहरात कंटेन्मेंट (रेड) झोन म्हणून घोषीत केलेल्या भागांतील आपल्या कर्मचाऱ्यांना शहरात इतर ठिकाणी न जाता आपले घर ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येते त्याच क्षेत्रीय कार्यालयाकडे काम करण्याचे आदेश दिले आहेत.