लखनौ – लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचे पूत्र आशीष उर्फ मोनू याच्यासह 13 जणांवर पाच हजार पानांचे पहिले आरोपपत्र सोमवारी दाखल केले.
तिकोमा येथे तीन ऑक्टोबर 2021 ला आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांसह एक पत्रकाराला मोटारीखाली चिरडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांसह अन्य तीन जणांचा त्यावेळी उफाळलेल्या हिंसाचारात मृत्यू झाला होता.
चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणात लखीमपूर येथील स्थानिक न्यायालयात सोमवारी सुमारे पाच हजार पानांचे आरोपपत्र 14 जणांवर दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात हत्या आणि हत्येचा प्रयत्न यांसह विविध गुन्ह्यांचा समावेश आहे, असे वरीष्ठ तपास अधिकारी एस. पी. यादव यांनी सांगितले.
या आरोपपत्रातील 13 जण सध्या अटकेत आहेत. तर पुरावे नाहीसे केल्याच्या आरोपातील विरेंद्र कुमार शुक्ला या नावाच्या आरोपीला अद्याप अटक केली नसली तरी त्याला समन्स बजावले आहे. शुक्ला हा अजय मिश्रा यांचा दूरचा नातेवाईक आणि भाजपचा ब्लॉक प्रमुख आहे.
आरोपींची नावे – आशिष मिश्रा, विरेंद्र शुक्ला, अंकित दास, नंदन दास भिस्त, सत्यम त्रिपाठी उर्फ सत्य प्रकाश त्रिपाठी, लतीफ उर्फ काल्या, शेखर भारती, सुमित जैस्वाल, आशिष पांडे, लवकुश, शिशुपाल, उल्हास कुमार त्रिवेदी उर्फ मोहित त्रिवेदी, रिंकु राणा आणि धमेंद्रकुमार बंजारा
आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित असून अन्य आरोपींचे अर्ज स्थानिक न्यायालयात प्रलंबित आहेत.
अलीकडेच विशेष तपास पथकाने न्यायालयात चार शेतकरी आणि एका पत्रकाराचा मृत्यू हा पूर्वनियोजित कटानुसार केलेल्या हत्या आहेत. हे निष्काळजीपणाने झालेले मृत्यू नाहीत, असे सांगून हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशी गंभीर कलमे लावण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार या दोन गुन्ह्यांसोबत शस्त्र कायद्याच्या उल्लंघनाचे कलमही लावण्यात आले.
भारतीय दंडसंहितेचे कलम 147 (दंगल), 148 (घातक शस्त्रांसह दंगल), 149 (समान हेतूने गुन्हा करण्यासाठी प्रत्येक सदस्य एकत्र येणे), 302 (हत्या) 307 (हत्येचा प्रयत्न), 326 (घातक शस्त्रांसह गंभीर इजा पोहोचवणे), 34 (समान हेतूने आर्थिक नुकसान) आणि 120 बी (गुन्हेगारी कट) आणि शस्त्र कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विरेंद्र कुमार शुक्लावर भादंवीच्या 201 नुसार (पुरावे नष्ट करणे किंवा गुन्हेगारांना मदत करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.