यवत, (वार्ताहर)- राज्यस्तरीय मंथन परीक्षेत दौंड तालुक्यातील लडकतवाडी जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश मिळविले. राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये तीन विद्यार्थी यांनी यश संपादन केले असून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत तीन विद्यार्थी झळकले आहेत.
लडकतवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची उच्च प्राथमिक शाळा आहे. शाळेत २३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी मंथन परीक्षेस ११० विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये रेवती मरसाळे हिने ९७.३३ टक्के गुण मिळवत राज्यात तिसरी आली. स्वरा सागर होले आणि सार्थक संदीप लडकत या दोघांनी ९४.६७ टक्के गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे.
जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत सहावीमधील सोहम झुरंगे व आदित्य जाधव यांनी ८७.३३ टक्के गुण मिळवून राज्यात नववा आणि जिल्ह्यात आठवा क्रमांक मिळविला. श्रुती भंडलकर हिने ८६.६७ टक्के गुण मिळवत राज्यात दहावा व जिल्हास्तरीय नववा क्रमांक मिळवला. तिसरीमधील विद्यार्थी अर्णव होले, वेदिका रायकर यांनी ९२.६७ टक्के व श्रद्धा ढवळे हिने ९२ टक्के गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवले.
एकूण १४ विद्यार्थी ७० टक्क्यांच्यावर आहेत. पहिलीमधील विद्यार्थ्यांना सतीश कोळपे, दुसरी मुलांसाठी राजेंद्र जाधव, तिसरीसाठी सविता शिंदे व सहावीसाठी आबा काशिनाथ झगडे यांनी प्रयत्न केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपट राजाराम होले व पिंपळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश कटके यांनी सन्मान केला. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ग्रामस्थ यांनी मुलांचे अभिनंदन केले.