पाच महिन्यांनंतर बाधितांची संख्या तीन लाखांच्या आत

नवी दिल्ली – एकीकडे ब्रिटनमध्ये करोना विषाणूची नवी प्रजाती सापडल्याने खळबळ उडाली असताना देशातील कोविड बाधितांची संख्या कमी झाली असल्याची दिलासादायक बातमी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील करोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, जवळपास साडेपाच महिन्यांनंतर देशातील सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाखांच्या खाली गेली आहे. सध्या देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येपैकी तीन टक्‍क्‍यांहून कमी ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत.

राजेश भूषण म्हणाले की, गेल्या 7 आठवड्यांमध्ये नव्या करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. सरासरीपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासात देशात आढळलेल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 57 टक्के रुग्ण मध्य प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र आणि केरळमधील आहेत.

तर गेल्या 24 तासात देशात जितक्‍या करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 61 टक्के मृत्यू उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, केरळ, पश्‍चिम बंगाल आणि महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत.

वर्ल्डोमीटर या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 7 कोटी 78 लाख 16 हजार 303 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 47 लाख 5 हजार 247 रुग्ण बरे झाले आहेत, तर 17 लाख 11 हजार 475 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 2 कोटी 13 लाख 99 हजार 581 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.