कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी अकरापासून सुरू झालेली आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी दीड वाजता पूर्ण झाली. सर्व 81 प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले असून आजच्या आरक्षण सोडती मध्ये अनेक दिग्गज मातब्बरांना याचा फटका बसला आहे.
यामध्ये मावळत्या महापौर, उपमहापौर, कॉंग्रेस गटनेता, विरोधी पक्षनेता, तारारानी आघाडी गटनेता यांच्यासह विद्यमान विसर्जित सभागृहातील 50 टक्के नगरसेवकांना फटका बसला आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या सोडतीसाठी या परिसरात इच्छुक उमेदवार आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
महानगरपालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बळकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. आज झालेल्या 81 प्रभागांच्या आरक्षण सोडतीमध्ये प्रामुख्याने अनुसूचित जातीजमातीसाठी 11 प्रभाग आरक्षित करण्यात आले असून त्यातील 6 प्रभाग हे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
दरम्यान अनुसूचित जमातीसाठी कोणताही प्रभाग आरक्षित करण्यात आलेला नाही. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 22 प्रभाग आरक्षित करण्यात आले असून त्यामध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी 11 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच सर्वसाधारण अर्थात खुल्य वर्गासाठी एकूण 48 प्रभाग निश्चित करण्यात आले असून त्यात सर्वसाधारण महिलांसाठी 24 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.