पिंपरी, (प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी कुणाल वैजनाथ वाव्हळकर यांची निवड करण्यात आली आहे. रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांनी पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी बर्खास्त केल्यानंतर शहराध्यक्षपदाच्या निवडीकरिता नियुक्त केलेल्या चार पदाधिकार्यांच्या समन्वय समितीने वाव्हळकर यांची एक वर्षाकरिता हंगामी निवड केली आहे.
रिपाइंच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर वारभुवन यांच्या समन्वय समितीची सोमवारी (दि.8) बैठक पार पडली. या बैठकीत वाव्हळकर यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या 17 जुलै 2023 च्या पत्रानुसार, पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर शहराध्यक्ष पदाच्या निवडीची जबाबदारी या समन्वय समितीवर सोपविण्यात आली होती. त्यानंतर या समितीने शहराध्यक्ष पदाकरिता इच्छुकांचे अर्ज मागविले होते. त्यामध्ये कुणाल वाव्हळकर व सम्राट जकाते यांनी अर्ज दाखल केले होते.
मात्र, त्यानंतर या पदाची निवड रखडली होती. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असताना, महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला शहराध्यक्ष आहे की नाही, यावरून पक्षातील दोन गटांत मतभेद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वाव्हळकर यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे.