लोणावळा, (वार्ताहर) – हिंदू समिती, लोणावळा आणि ग्रामीण यांच्या वतीने हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या पाडवा रॅलीमध्ये लोणावळेकारांसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सुमारे दीड हजाराहून अधिक दुचाकींवरून हजारोच्या संख्येने नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
लोणावळा शहरात दरवर्षी गुढी पाडव्याला हिंदू नववर्षाच्या स्वागतार्थ हिंदू समितीच्या वतीने भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात येते. यंदा रॅलीचे हे दहावे वर्ष असून या दशकपूर्ती निमित्ताने हिंदू समितीच्या वतीने एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. 9) रोजी सकाळी 11.30 वाजता लोणावळा शहरातील पुरंदरे विद्यालय, लोणावळा या पटांगणातून सुरु करण्यात आलेली ही रॅली बाजारपेठ, गवळीवाडा नाका, कैवल्यधाम, तुंगार्ली, इंदिरा नगर, अंबरवाडी या मार्गाने पुढे नेत खंडाळा याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीमध्ये पक्ष, संघटना सर्व काही बाजूला ठेवत आपआपल्या दुचाकीवरून सर्व पक्षाचे, संघटनाचे आजीमाजी पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, ग्रामीण परिसरातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती, लहान मुले, मुली यांनी मोठ्या संख्येने आपापल्या तसेच आपल्या पालकांच्या, मित्रांच्या दुचाकींवरून सहभाग घेतला होता. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रॅली मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ठिकठिकाणी फुलांची उधळण
लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक याठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांसाठी पाणी, थंड पेय यांची व्यवस्था करण्यात आली होती. रॅली मार्गात ठिकठिकाणी या संपूर्ण रॅलीवर फुलांची उधळण करून फटाके फोडून रॅलीचे स्वागत करण्यात आले.