खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात पावणे सतरा कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखली होती.
अनेक वर्षापासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या 24 थकबाकीदारांवर नगरपरिषदेमार्फत मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी नळ कनेक्शन तोडण्यात आले, थकबाकीदारांच्या नावांचे बॅनरद्वारे जाहीर प्रसिद्धी यासारखी कारवाई करण्यात आल्याने वसूलीत वाढीचा विक्रम करीत नगरपालिकेच्या तिजोरीत 31 मार्च अखेर पावणे सतरा कोटी रूपये जमा झाले आहेत.
काही महिन्यांपासून मालमत्ता कर विभागाचे गौतम भगळे, गजानन जाधव यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एकूण 20 कर्मचारी कर वसूली मोहिमेकरिता नेमण्यात आले होते. पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यवसायिक मालमत्ता कर धारकांकडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरु केली. अनेक वर्षापासून मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या 24 थकबाकीदारांवर नगरपरिषदेमार्फत मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली.
मार्चनंतरही कारवाई सुरूच राहणार
तर काही ठिकाणी नळ कनेक्शन कट करणे, थकबाकीदारांची बॅनरद्वारे जाहीर प्रसिद्धी देणे, यासारखी कारवाई केल्यामुळेच यावर्षी पावणे सतरा कोटीची मालमत्ता कराच्या वसुलीमध्ये वाढ झाली आहे. तसेच यापुढे मार्च अखेरीनंतर देखील वसुलीची मोहीम नगरपरिषदेमार्फत सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी आपला मालमत्ता कराचा भरणा वेळेवर करून शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत हातभार लावावा, असे अवाहन मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केले आहे.