नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे (आप) माजी नेते कुमार विश्वास यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे. केंद्र सरकारने शनिवारी संबंधित निर्णय घेतला.
विश्वास यांनी अलिकडेच केलेल्या एका वक्तव्याने राजकीय सनसनाटी निर्माण झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पंजाबमधील फुटीरवाद्यांना पाठिंबा असल्याच्या आशयाचा आरोप विश्वास यांनी केला. त्यावरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
त्यांना असलेल्या संभाव्य धोक्याबाबत गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, विश्वास यांना केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) सुरक्षा पुरवेल. त्या दलाचे चार जवान विश्वास यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. विविध राज्यांतील भाजप नेत्यांना केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात आल्याच्या घडामोडी याआधी घडल्या आहेत. त्यामुळे विश्वास यांनाही तशी सुरक्षा पुरवण्याचा निर्णय चर्चेचा विषय बनणार आहे. भाजप आणि विश्वास यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे वारंवार बोलले जाते.