श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये शोपियां जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचे दोन जवान शहिद झाले. या चकमकीदरम्यान एक दहशतवादीही मारला गेला, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या झैनपोरा भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर लष्कराने या भागात नाकाबंदी केली आणि शोध मोहिमेला सुरूवात केली होती. या शोध मोहिमेदरम्यान लपून राहिलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामुळे या ठिकाणी जोरदार चकमकीला प्रारंभ झाला.
या चकमकीदरम्यान लष्कराचे दोन जवान शहिद झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चकमकीदरम्यान एक दहशतवादी ठार झाला. ठार झालेल्या या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम अजून सुरू आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.