बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री कृती सेननने आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला आहे. कृतीचा जन्म 27 जुलै 1990 रोजी नवी दिल्ली येथे झाला होता. तिचे वडील राहुल सेनन सीए, तर आई गीता सेनन दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. खुद्द कृतीनेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तिने नोएडाच्या महाविद्यालयातून बी. टेक केले आहे.
कृती सेननने आपल्या करियरची सुरवात साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत केली. तिचा पहिला चित्रपट तेलुगू सायकॉलॉजिकल थ्रिलर “नेनोक्काडाइन’ हा होता. या चित्रपटासाठी कृतीची खुप प्रशंसा झाली, पण तिचा प्रसिद्धी मिळू शकली नाही. यानंतर कृती ही टायगर श्रॉफसमवेत शब्बीर खानच्या “हिरोपंती’मध्ये झळकली. हा तिचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. हा चित्रपट हिट ठरला आणि कृतीला चांगली प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने बॉलीवूडच्या अनेक बड्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात “दिलवाले’, “बरेली की बर्फी’ आणि “लुका छुपी’ इत्यादींचा समावेश आहे.
तसेच कृतीने फिल्मी करिअरमध्ये शाहरुख खानसोबत देखील काम केले आहे. पण ती सलमान खानची मोठी फॅन आहे. चित्रपटांपूर्वी कृती अनेक दूरदर्शन जाहिरातींमध्येही दिसली आहे. तसेच आपल्या दमदार अभिनयाने तिने फिल्मफेअर पुरस्कारही मिळविला आहे.