कराड (प्रतिनिधी) -येथील कृष्णा हॉस्पिटलने शनिवारी करोनामुक्तीचे पाचवे शतक पूर्ण केले. संपूर्ण जिल्ह्यात करोनाचा वाढता कहर लक्षात घेता कृष्णा हॉस्पिटलमधून करोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा दिलासा देणारा आहे. दरम्यान, शनिवारी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह 16 करोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आजपर्यंत 509 जण करोनामुक्त झाले आहेत.
शनिवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये कराड तालुक्यातील बुधवार पेठेतील 31 वर्षीय पुरूष, कोडोली येथील 31 वर्षीय महिला, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरूष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय पुरूष, कृष्णा हॉस्पिटलमधील 27 वर्षीय पुरूष, वाण्याचीवाडी येथील 62 वर्षीय महिला, टेंभू येथील 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. पाटण तालुक्यातील खळे येथील 33 वर्षीय पुरूष, तारळे येथील 24 वर्षीय पुरूष, काळगाव येथील 20 वर्षीय महिला, नेराळे येथील 32 वर्षीय पुरूष, नाटोशी येथील 53 वर्षीय पुरूष, महिंद येथील 58 वर्षीय पुरूष, किवळ येथील 69 वर्षीय पुरूष, मिरगाव येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
करोनाची लढाई जिंकलेल्या या करोनामुक्त रूग्णांचा कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, राजेंद्र सनदे, योगेश कुलकर्णी, डॉ. संजय पाटील, डॉ. सतीश पाटील, रोहिणी बाबर, कविता कापूरकर, संध्या जगदाळे यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.
माझा करोना रिपोर्ट बुधवार, दि. 22 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. त्यावेळी मनात नक्कीच भीती दाटून आली होती. कृष्णा हॉस्पिटलमध्ये मिळालेल्या उपचाराच्या जोरावर मी करोनावर मात केली आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करोनामुक्तीचे सुरू असलेले काम वाखणण्याजोगे आहे.
रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कराड नगरपालिका