फलटण (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व दुकानदार व व्यावसायिकांनी कोविड चाचण्या करून घेणे अनिवार्य आहे, असा आदेश प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिला आहे. दुकानदार व व्यवसायिकांनी 21 मार्चपर्यंत कोविड चाचण्या न केल्यास दुकाने, व्यवसाय सुरू ठेवता येणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे.
फलटण तालुक्यात दुकाने व व्यावसायिक आस्थापना सुरू असल्याने तेथे अनेक नागरिकांची ये-जा सुरू आहे. दुकानदार अथवा व्यावसायिक आस्थापनेवरील व्यक्ती, कामगारांचा प्रत्येक दिवशी अनेक ग्राहकांशी संपर्क येत असल्याने कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सर्व दुकानदार व व्यावसायिकांनी 21 मार्चपूर्वी कोविड चाचण्या करून घेतल्या नाहीत, तर संबंधित दुकान, आस्थापना सुरू ठेवता येणार नाही, असा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिला आहे.