नवी दिल्ली : करोनाने जगातील २०४ देशांत आपले बस्तान बसवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसला महामारी असे घोषित केले आहे. या महामारीवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलबद्ध नसल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या आकड्यांच्या आधारावर worldometers.info ने दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसने आतापर्यंत ५३ हजार २३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत.
करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनेही या रोगाची धास्ती घेतली आहे. अमेरिकेत दोन लाख ४४ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत सहा हजांरापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पृथ्वीच्या निम्म्या भागांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची टाळेबंदी सुरू असतानाही गेल्या २४ तासांत करोना विषाणूने जगभरात हजारो बळी घेतले असून, यात स्पेनमधील नव्या १ हजार बळींचा समावेश आहे.
जगभरात जेवढ्या लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, त्यापैकी जवळजवळ एक चतुर्थांश लोक अमेरिकेतील आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत तेथील करोनाबळींची संख्या ५ हजारांपलीकडे पोहचल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने सांगितले.