रत्नागिरी- कोकण रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसला आज अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी एक्स्प्रेस रुळावरून घसरली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जवळच्या बोगद्यात ही घटना घडली असून बोगद्यात दरड कोसळल्यानं हा अपघात झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगद्यामध्ये आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त राजधानी एक्स्प्रेस गोव्याच्या दिशेनं निघाली होती. करबुडे बोगद्यातील ट्रॅकवर दरड कोसळल्यानं इंजिनाचं पुढील चाक रुळावरून घसरले. या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक थांबली आहे.
अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तत्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. अपघात बोगद्यात झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.