आळेफाटा, (वार्ताहर) – राष्ट्रीय ग्राम अभियानांतर्गत 2023-24 या वर्षांच्या कृती आराखड्यास केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे. या अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, विविध पदावर कार्यरत असणार्या अधिकारी व कर्मचार्यांनी रत्नागिरीमधील हातीव, नाचणे, कोतवडे, खामशेत, जालगाव व विरसाई या ग्रामपंचायतींना भेटी दिल्या.
या ग्रामपंचायतींनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष अनुभव, माहिती घेतली असून त्यांच्यासारखे उपक्रम आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये राबविता कसे येतील याचे नियोजन केले आहे.
जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या आदेशाप्रमाणे जुन्नर तालुक्याचे गट विकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी पुढील नियोजन करत तालुक्यातील 4 ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक तसेच चिंचोली काशीद गावाचे सरपंच खंडू काशिनाथ काशीद तर या अभ्यास दौर्याचे समन्वयक म्हणून बाळासाहेब गावडे, विस्तार अधिकारी, शिरूर यांनी काम पाहिले.
जुन्नर तालुक्यातील रिया रसूल इनामदार, रंजना युवराज रघतवान, सुरेखा भीमराव कुदळ व प्रदीप रामदास खिलारी हे या उपक्रमामध्ये आदेशित केले होते. दरम्यानच्या कालावधीत या दौर्यात समाविष्ट असणारे ग्रामविकास अधिकारी प्रदीप खिलारी म्हणाले की, या दौर्यादरम्यान आम्हाला भरपूर असे शिकायला मिळाल्याची माहिती त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली.