Lok Sabha Election 2024 । रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. अशात आज भाजपचे नारायण राणे यांना येथून उमेदवारी देण्यात आली. महायुतीतील शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक होते. मात्र भाजपने आज या जागेवरून नारायण राणे यांना उमदेवारी दिल्यानंतर उदय सामंत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
आज भाजपने लोकसभा उमेदवारांची 13 वी यादी जाहीर केल्यानंतर उदय सामंत माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’आम्ही युतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता लोकसभा निवडणुकीत त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे.
तत्पूर्वी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. शिंदे गटाकडून ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग आमचाच, भावी खासदार किरण सामंत’ अशा स्वरूपाचे स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा किरण सामंत यांना फायनल झाली का? अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु आज उदय सामंत आणि किरण सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली असून, युतीच्या उमेदवराचं काम करणार असल्याचं जाहीर केल आहे.