न्हावरे (वार्ताहर) – न्हावरे (ता. शिरूर) परिसरातील कोकडेवाडी येथे पेरणीच्या कामासाठी आठ दिवसांपूर्वी आलेल्या व मूळच्या कोंढवा (पुणे) येथील रहिवासी असलेल्या 55 वर्षीय महिलेचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोकडेवाडी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कोकडेवाडी येथे कोंढवा येथून एक 55 वर्षीय महिला पतीसह शेतातील पेरणीच्या कामासाठी 12 जूनला आली होती. दरम्यानच्या काळात या महिलेने आपला मुक्काम कोकडेवाडी येथील नातलगांच्या घरी केला होता. ही महिला परत कोंढवा येथील घरी गेल्यानंतर तिच्या कोंढवा येथे राहणाऱ्या पुतण्याचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेची करोना तपासणी केली असता, तिचा अहवाल (दि. 20) पॉझिटिव्ह आला. याच महिलेच्या कोकडेवाडी येथील दोन नातलगांनी तिच्या कोंढवा येथील घरी एक दिवस मुक्काम केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजताच न्हावरे येथील ग्रामप्रशासन व आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून, महिलेच्या कोकडेवाडी येथे संपर्कातील दहा व्यक्तींना होम क्वारंटाइन केले आहे. आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केलेल्या दहा व्यक्तींचे घशातील द्रव (स्वॅब) (दि. 23) तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. असे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम हाती घेतल्याचे सरपंच मंदा शेंडगे व ग्रामविकास अधिकारी पी. सी. केदारी यांनी सांगितले.
साबळेवाडीच्या रुग्णाची करोनावर मात
शिरूर – टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे मुंबईवरून आलेल्या एका 58 वर्षीय पुरुष करोनावर मात करून पुन्हा आपल्या घरी परतला असल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व टाकळीहाजी प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड यांनी दिली. यामुळे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी बेटभाग आता करोनामुक्त झाला असून या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.