चारचाकीमधून दोघांचाच प्रवास
कोल्हापूर : संचारबंदीच्या कालावधीत सामाजिक अंतर राखण्यासाठी दुचाकीवरुन दोघांना फिरण्यास बंदी आहे. चारचाकीमधूनही चालवणारी एक व्यक्ती आणि पाठीमागे एक अशा दोघांनीच प्रवास करावा. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.
आज कोल्हापूर जिल्ह्यात एक जण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. दि. 16 एप्रिल रोजी एका मोठ्या कंटेनरमधून जवळपास 30 लोक बेकायदेशीररित्या मुंबईहून कर्नाटककडे चालले होते. त्यांना किणी टोलनाक्याजवळ पोलीसांनी अडवून सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.
आज करोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण हा यामधील आहे. बाकीचे 10 अहवाल हे निगेटिव्ह असून यातील अद्यापही 18 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. या सर्व व्यक्ती कर्नाटकमधील हसन आणि त्या परिसरातील आहेत. बेकायदेशीर प्रवास करत असताना या सर्वांना अडवले त्यामुळे कर्नाटकात होणारा संसर्ग थांबवला आहे. तपासणी न करता हे सर्वजण कर्नाटकात गेले असते, तर मोठा प्रसार झाला असता, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.