मुंबई – अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या “टेन्शनवरची मात्रा – महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करण्यासाठी सज्ज असते. या कार्यक्रमात समीर चौगुले, विशाखा सुभेदार, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, गौरव मोरे, प्रभाकर मोरे इत्यादी कलाकार प्रेक्षकांना हसवत असतात. मात्र, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी बजविल्यानंतर अभिनेते ‘प्रभाकर मोरे’ यांनी आता राजकारणात प्रेवेश केला आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभाकर मोरे यांना सांस्कृतिक कोकण विभागाच्या अध्यक्ष पादाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक कलाकार सध्या राजकारणात सक्रीय आहेत. आपल्या अभिनयासोबतच त्यांची राजकारणातील चर्चाही अनेकदा होते. त्यातच आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या देखील नावाचा आता समावेश झाला आहे.
प्रभाकर मोरे यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन, शेजारी शेजारी यासारख्या मालिकेत मोरे यांनी प्रमुख भुमिका साकरल्या होत्या. मात्र, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्रभाकर मोरेंची ओळख ‘कोकणचा पारसमणी’ म्हणून सर्वाधिक आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कोकण सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्ष पादाची जबाबदारी ‘कोकणचा पारसमणी’ याला मिळाली आहे.