दुबई – विराट कोहलीने फटकावलेले दमदार शतक व त्याला साथ देताना लोकेश राहुलने झळकावलेले अर्धशतक आणि ऋषभ पंतने दिलेली साथ यांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर गटातील अखेरच्या लढतीत 2 गडी गमावून 212 असा धावांचा डोंगर उभारला.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजी दिली. भारताच्या डावाची सुरुवात थाटात करताना सलामीवीर लोकेश राहुलने सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीच्या साथीत संघाला शतकी सलामी दिली. यंदाच्या स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच शतकी सुरुवात मिळाली. राहुलने सुरुवातीला जम बसवण्यात वेळ घेतला मात्र, त्यानंतर चौफेर फटकेबाजी करत अर्धशतक साकार केले. मात्र, त्यानंतर त्याचा संयम ढळला व तो 41 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 2 षटकार यांच्या मदतीने 62 धावा काढून बाद झाला.
That 71st 💯 feeling 😍 #AsiaCup2022 | #INDvAFG pic.twitter.com/VDoBsCGzMm
— ICC (@ICC) September 8, 2022
दरम्यान कोहलीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादवने 1 षटकार मारत चांगली सुरुवात केली मात्र, बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याची चूक त्याला महागात पडली व त्याचा 6 धावांवरच त्रिफळा उडाला. यावेळी यष्टीरक्षक ऋषभ पंतला फलंदाजीत बढती देण्यात आली. त्याने कोहलीला सुरेख साथ देत संघाला द्विशतकी धावसंख्या उभारून दिली.
कोहलीने अर्धशतकानंतर खेळण्याचा गिअर बदलला व आक्रमक फलंदाजी केली. त्याने चौकार व षटकारांची आतषबाजी करत थाटात आपले शतक साकार केले. पंत 16 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावांवर नाबाद राहिला. तर कोहलीने 61 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार व तब्बल 6 षटकारांची आतषबाजी करताना नाबाद 122 धावांची स्वप्नवत खेळी केली. पंतच्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी अवघ्या 42 चेंडूत 87 धावांची अभेद्द भागीदारी केली. अफगाणिस्तानकडून फरीद मलिकने 2 गडी बाद केले.
या सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्माने विश्रांती घेतली व राहुलकडे कर्णधारपद सोपवले होते. तसेच रवीचंद्रन अश्विनला वगळून दिनेश कार्तिकचा संघात समावेश केला होता. तसेच यजुवेंद्र चहल व हार्दिक पंड्या यांच्या जागी अक्सर पटेल व दीपक चहरला संधी दिली.
संक्षिप्त धावफलक : भारत – 20 षटकांत 2 बाद 212 धावा. (लोकेश राहुल 62, विराट कोहली नाबाद 122, ऋषभ पंत नाबाद 20, फरीद मलिक 2-57)