पिंपरी – विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला हाताने इशारा करून बाजूला होण्यास सांगितले. यावरून समोरून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी विरुद्ध दिशेने जाणाऱ्या डॉक्टर तरुणावर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा चार वाजता यशवंतनगर, पिंपरी येथे घडली.
प्रवीण रुद्रय्या मठ (वय 29, रा. यशवंतनगर, पिंपरी) असे जखमी डॉक्टराचे नाव असून त्यांनी याबाबत रविवारी (दि. 18) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजय बाबासाहेब पौळ (रा. विठ्ठल नगर, पिंपरी), आप्पा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 15) दुपारी सव्वा चार वाजता फिर्यादी डॉ. प्रवीण हे यशवंतनगर, पिंपरी येथून दुचाकीवरून विरुद्ध दिशेने चालले होते. त्यावेळी समोरून एका दुचाकीवरून आरोपी येत होते. त्या दुचाकीस्वाराला हाताने इशारा करून बाजूला होण्यास डॉक्टरांनी यांनी सांगितले. यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत भांडणे केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये येऊन ‘बाहेरून येऊन दादागिरी करतो काय’ असे म्हणून फिर्यादी यांना खाली बोलविले. त्यानंतर डॉक्टर प्रवीण यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये ते फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यातील हवालदार जाधव याबाबत अधिक तपास करीत आहेत.