दुबई – प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे राजस्थान रॉयल्सला अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी 192 धावांची गरज असताना फलंदाजी ढेपाळल्यामुळे राजस्थानला प्ले ऑफच्या संधीवरही पाणी सोडावे लागले. पॅट कमिन्स सामनावीर ठरला.
जोस बटलर, राहुल तेवतिया आणि श्रेयस गोपाल यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. दुसरीकडे या विजयासह कोलकाता संघाने प्ले ऑफ मधील स्थान मिळवण्याच्या आशा कायम राखल्या.
तत्पूर्वी, जोफ्रा आर्चरने पहिल्या षटकात नितीश राणाला बाद केले. मात्र, त्यानंतर कर्णधार इयान मॉर्गन, शुभमन गील, राहुल त्रिपाठी व आंद्रे रसेल यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 7 बाद 191 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. मॉर्गनने नाबाद 68 धावांची खेळी करत राजस्थानसमोर कठीण आव्हान उभे केले.
राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. आर्चरने पहिल्याच षटकांत राणाला बाद करत थाटात सुरुवात केली. त्यानंतर गीलने राहुल त्रिपाठीसह दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागिदारी केली व संघाचा डाव सावरला.
गील 36 धावा करून बाद झाल्यानंतर सुनील नरेनने पुन्हा एकदा निराशा केली. मात्र, त्यावेळी त्रिपाठीला साथ देताना मॉर्गनने आक्रमक फलंदाजी केली. स्थिरावलेला त्रिपाठी देखील 39 धावांवर परतला. या सामन्यात सातत्याने अपयशी ठरत असलेल्या दीनेश कार्तिकला पुन्हा एकदा अपयश आले. यावेळी कोलकाताची अवस्था 13 व्या षटकांत 5 बाद 99 अशी बिकट बनली होती.
त्यावेळी कर्णधार मॉर्गनने जबाबदारीने फलंदाजी कशी करायची याचा वस्तूपाठच दाखवून दिला. त्याने 6 व्या गड्यासाठी आंद्रे रसेलसह 45 धावा जोडल्या. रसेलने 11 चेंडूत 1 चौकार व 3 षटकार फटकावताना 25 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर पॅट कमिन्सनेही 15 धावा करत मॉर्गनला सुरेख साथ दिली.
दरम्यान, मॉर्गनने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. त्याने नाबाद 68 धावांची खेळी करताना केवळ 35 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व तब्बल 6 षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळेच कोलकाताला राजस्थानसमोर विजयासाठी 192 धावा करण्याचे आव्हान उभे करता आले.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 7 बाद 191 धावा. (शुभमन गील 36, राहुल त्रिपाठी 39, आंद्रे रसेल 25, पॅट कमिन्स 15, इयान मॉर्गन नाबाद 68, कमलेश नागरकोटी नाबाद 1, राहुल तेवतिया 3-25, कार्तिक त्यागी 2-36, जोफ्रा आर्चर 1-19).
राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 9 बाद 131 धावा. (जोस बटलर 35, राहुल तेवतिया 31, श्रेयस गोपाल नाबाद 23, पॅट कमिन्स 4-34, शिवम मावी 2-15, वरून चक्रवर्ती 2-20, कमलेश नागरकोटी 1-24).