पुणे – आंबेगाव बुद्रुक येथील कचरा प्रकल्प पेटविल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 15 ते 20 अज्ञात व्यक्तींविरोधात महापालिकेचे ठेकेदार मिलींद पवार(रा.हडपसर) यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी तेथील आग धुमसतच होती. अग्निशमन दलाच्यावतीने आग आटोक्यात आणण्याचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
महापालिकेने उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प हटविण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हिसंक झालेल्या स्थानिक नागरिकांच्या जमावाने तेथील कार्यालय आणी प्रकल्प पेटवून दिला होता.
पवार यांनी दिलेल्या तक्रारीनूसार अज्ञात व्यक्तींनी गैरकायद्याची मंडळी जमवून महापालिकेच्या कचरा प्रकल्पावर हल्ला केला. यामध्ये पवार यांचा जेसीबी आणी पोकलॅंड मशिनची तोडफोड केली. महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे.
तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कवठेकर यांनी दिलेल्या माहितीनूसार प्रकल्पात अद्यापही आग धुमसत आहे. यामध्ये प्रकल्पामध्ये जाता येणे शक्य नाही. आग पूर्णपर्ण आटोक्यात आल्यानंतरच महापालिकेचे अधिकारी नुकसानीची माहिती देऊ शकतील.