मुंबई – माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅगखरेदीत घोटाळा केल्याचा किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे.
मुंबई महापालिकेने करोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग 2000 रुपयांऐवजी 6 हजार 800 रुपयांना खरेदी केल्याचे म्हंटले जात आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर होत्या. ईडीने 21 जून रोजी विविध ठिकाणी छापे मारले होते.
21 जूनला ईडीने केलेल्या छापेमारीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश होता. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम आणि जवळपास 150 कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. याशिवाय 15 कोटींच्या एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर त्यानंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार,’ असे किरीट सोमय्या म्हणाले.