Ram Songs : भारताच्या इतिहासात 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. अनेक दशकांच्या संघर्ष, समर्पण आणि प्रतिक्षेनंतर भव्य राम मंदिराचा अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा एक दिव्य अनुभव असेल,
जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. प्राचीन मंत्रोच्चार, भजन-कीर्तन, देवतांचा अभिषेक, मंदिर परिसरात दीपप्रज्वलन यामुळे संपूर्ण अयोध्या भक्तीमय होऊन जाणार आहे.
दरम्यान, याच सोहळ्याचं औचित्य साधत प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘अयोध्येचा राजा आपला राम मंदिरी अवतरला…’ असे या गाण्याचे शब्द आहेत.
या गाण्याला असलेलं संगीत प्रत्येक रामभक्ताला उत्साह देणारं आहे. हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.
ग्राफिक्सचा उत्तम वापर करून या गाण्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. त्यात भावभक्तीने ओथंबलेले श्रीराम भक्त, शरयू तीरावरील आरती, श्रीराम मंदिराची दृश्ये दाखवण्यात आली आहेत.
अवघा देश श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या भव्यदिव्य सोहळ्याकडे डोळे लावून बसलेला असताना आता या प्रभू श्रीराम या गाण्यामुळे आता अनेकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.