पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील ( विद्या प्रधिकरण) शिक्षण सहसंचालक पद हे शिक्षण सक्षमीकरण शाखेला देण्यात आले असुन या पदावर शोभा खंदारे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. १७ मार्च २००३ च्या विभागाच्या आकृतीबंधानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय आस्थापनेवरील शिक्षण सहसंचालकाची १३ पदे मंजूर असून ४ पदे प्रतिनियुक्तीसाठी उपलब्ध आहेत.
१७ पदांपैकी एक पद राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे कार्यालयासाठी मंजूर आहे. २२ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षण सहसंचालक तसेच महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) मधील सहसंचालक पदासाठीचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. शिक्षण सह संचालक संवर्गासाठी एकूण १७ पदे मंजूर असून त्यापैकी १६ पदे प्रशासन शाखेसाठी मंजूर असून १ पद शिक्षण सक्षमीकरण शाखेसाठी मंजूर आहे. सुधारित आकृतीबंधामध्ये एक पद राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे कार्यालयात सहसंचालक (प्रशिक्षण) हे पद दर्शविण्यात आलेले आहे.
सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) मधील प्राचार्य पदावर किमान ३ वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या योग्य व्यक्तीस निव्वळ गुणवत्ता-नि-सेवा ज्येष्ठता या निकषांच्या आधारे पदोन्नती देण्यात येते. त्याअनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (शिक्षण सक्षमीकरण शाखा) मधील प्राचार्य पदावर कार्यरत असणाऱ्या शोभा खंदारे यांची शिक्षण सहसंचालकपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामुळे शिक्षण सहसंचालक पदावरून रमाकांत काठमोरे यांना पाय उतार व्हावे लागले आहे. खंदारे यांनी तत्काळ पदोन्नतीने शिक्षण सहसंचालकपदाची सुत्रे हाती घेतली आहे.